‘काय करावं’ हे माणसाला समजलं नाही तरी एक वेळ चालतं, पण ‘काय करु नये’ हे कळालंच पाहिजे. नाहीतर नको ते होऊन बसतं आणि मग झालेलं खुप नको नको होतं. मी पण तो गांजा ओढण्याचा अनुभव घ्यायला नाही पाहिजे होतं. कारण दारु प्यायल्यावर माणसाचं माकड होतं, तसं गांजा ओढल्यावर त्याचं डुक्कर, हत्ती, गाढव, कुत्र, गेंडा आणि हरीण सुद्धा होतं. गांजा पिऊन मी हत्तीसारखा झुलत झुलत बाहेर आलो तर तिथेच चिखलात पडलेल्या काही वराह कुमारांवर माझा पाय पडला. मग त्यातला एक कुत्र्यासारखा मला चावला. मग मी त्याला गाढवासारखं लाथा झाडल्या. तो गेंड्यासारखा धावुन आला. मग मी हरणासारखा पळुन गेलो. समोरुन येणारा ख-याखु-या म्हशींचा कळप मला दिसलाच नाही. मग मी....
..................मग मी वाचत होतो त्या पुस्तकाचं पान उलटलं.
छे हो... मी कसला गांजा पितोय. व्यसन करायला संधी आणि हिंमत लागते. आम्ही आपले संधीविना चारित्र्यवान. हे गांजाप्रकारण पुस्तकात वाचत होतो. मला जर कुठलं व्यसन असेल तर पुस्तक वाचण्याचं. पुस्तकांशिवायच्या जगाची कल्पनाही मला असह्यच वाटते. पुस्तक तुम्हाला खुप वेगळ्या जगात घेऊन जातात. जे तुम्ही प्रत्यक्षात जगु शकत नाही, ते तुम्हाला पुस्तकं जगवतात. तुमच्याही नकळत तुम्ही त्या पुस्तकातलं एखादं पात्र बनुन जाता आणि मग विसर पडतो सगळ्या जगाचा....!
परवा बसची वाट बघत असंच एका छान पुस्तकात गांजा ओढताना हरवुन गेलो होतो. अचानक कोणीतरी बोललं माझ्याशी आणि मी दचकुन वर पाहिलं. एक तरूण मुलगा, माझ्या हातातल्या पुस्तकाकडे बघत म्हणाला "हि जि बस पकडलीये ती सोडु नकात, मग अशा दहा बसेस सुटल्या तरी चालतील. तुम्हाला हवय तिथे तुम्ही पोहचणारच.... किंवा तुम्ही आधिच तिथे पोहचलाय". ते पुस्तक वाचण्याच्या नादात मी चार बसेस सोडल्यात हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं. गंमत वाटली.... माझ्या स्वतःचीच आणि त्याच्या सल्ल्याची!
पुस्तक घट्ट धरत त्याला म्हणालो की "नाही सोडणार हि बस कधी." तो प्रसन्न हसला.
"काय करता तुम्ही?" - मी विचारलं.
"मी नाट्य मंदिरात डोअरकिपर आहे." - तो.
मी उडालोच. त्याच्या अंगातले कपडे पाहुन ब-याच सधन घरातला वाटला. त्याला तसं विचारलं तर म्हणाला की "खरय... एका चांगल्या कंपनीत ब-यापैकी कमावतोय. पण ते फक्त पोटापाण्यासाठी. माझं खरं वेड, खरं जग म्हणजे नाटक. आधि रोज तिकीट काढुन थिएटरात नाटक बघायला जायचो. मग तिथल्या डोअरकिपर्सशी ओळख झाली आणि त्यांचा ग्रुप जॉइन केला. मग तिथेच डोअरकिपर म्हणुन संध्याकाळी काम करतो. जिवंत राहण्यासाठी कंपनीत नोकरी करतो पण त्यापेक्षा जगण्यासाठी काय करतो हे महत्वाचं. म्हणुन तुम्ही म्हणालात की ‘काय करता?’ तर म्हणालो की मी डोअरकिपर आहे."
मनात म्हणालो की आपलंही असंच आहे की....!
आता इथुन पुढे कोणी विचारलं की ‘काय करता तुम्ही’ तर सांगायचं, "मी पुस्तकं जगतो."
....आणि मग छंदच लागला प्रत्येकाला हे विचारायचा की नोकरी सोडुन तुम्ही जगण्यासाठी काय करता. कंडक्टर, दुकानातला वाणी, आमचा दुधवाला, पानवाला, भाजीवाला, न्हावी, चांभार, पोस्टमन, एक रिक्षावाला, मास्तर, कामावरचे सहकारी मित्र इतकंच काय माझ्या ऑफिसच्या रस्त्यावर बसणा-या एका ज्योतिषीलाही तेच विचारलं. दुस-याच्या भविष्यात स्वतःचं वर्तमान शोधणारा तो ज्योतिषी अचानक मला भूतकाळातच घेऊन गेला. जिथे बसला होता तिथली मागची पेटी त्यानी ओढुन घेतली आणि तो खजिन्याचा पिटारा माझ्यासाठी उघडला. हो... खजिनाच होता तो. त्यात बालपणच होतं माझं. कागदात गुंफलेलं.. कागदात कोरलेलं. रस्त्यावरच्या कोणा ज्योतिषाला ओरीगामीचा नाद असेल, असं मला सांगुनही खरं वाटलं नसतं. त्या पेटीतला हत्ती, सिंह, रनगाडा, फुलं, फुलपाखरु, पक्षी, वेगवेगळ्या आकाराच्या खुप सुंदर डब्या, अंगठ्या... काय काय नी काय काय ! लहान मुलासारखा हरवुनच गेलो त्या पेटीत. तो ज्योतिषीही खुप उत्साहात सगळं दाखवत होता. "घरी या एकदा. तुम्हालाही बघायचय ना की मी जगण्यासाठी काय करतो.... सगळं घर भरलय अशा वस्तुंनी." ....त्या गुरुचं आमंत्रण स्विकारलं आणि आणि त्याच्याकडुन ओरीगामीचे काही प्रकार शिकुन पुढे निघालो.
मधेच एक दर्दी दारुडा भेटला. जगण्यासाठी तो काय करत असेल असा प्रश्न पडला नाही. कारण तोंड उघडायच्या आधिच उत्तराचा जोरदार भपका आला. तरी त्याला विचारलंच. म्हणाला, "दोस्तांमुळे असा झालो साहेब. संध्याकाळपर्यंत इमानदारीत काम करतो पण कामावरुन घरी जाताना दारुच्या गुत्त्यापाशी आपला दोस्त गालीब माझी वाट बघत उभा असतो. मग संध्याकाळ चढत जाते आणि रंगत जातं जगणं.... साहेब, त्या मैफ़लींसाठी जगतो मी. अन मधल्या मध्ये ती बिचारी दारु बदनाम होते याचं वाईट वाटतं."
पुढे गेलो तसं, बागेच्या बाहेर कट्ट्यावर बसलेले एक आजोबाही भेटले. आकाशात पसरलेले ढग हवे तसे हलवुन त्यांचे ते सोईप्रमाणे केलेले आकार रंगवत बसले होते. कुठल्याही कॅनव्हॉस किंवा ब्रशशिवाय त्यांनी तिथल्या तिथे एक चित्र काढलं आणि रंगवुनही टाकलं. आणि रंगांनी भरलेली एक संध्याकाळ पिशवीत घालुन घरी घेऊन गेले.... जगण्यासाठी."
घराजवळ आलो तर एक जुना मित्र फार दिवसांनी भेटला. काय बोलु आणि काय नको असं झालं होतं. त्याला म्हणालो की रविवारी भेटुयात का? तर म्हणाला,
"रविवार सोडुन कधिही बोल. हवं तर कामावर दांडी मारुन येतो पण रविवार जमणार नाही. मी दर रविवारी सकाळी वृद्धाश्रमात जातो आणि तिथल्या म्हाता-यांसोबत ब्रेकफास्ट करतो, गप्पा मारतो, गाणी म्हणतो, बागकाम करतो. काही प्रश्न असतील सोडवतो... मग सगळा दिवस तिथेच असतो. त्यांचा विरंगुळा व्हायचा प्रयत्न करतो. काही रविवारी अनाथआश्रमातही जातो. मुलांशी खेळायला, दंगा करायला. त्यांचा दोस्त व्हायचा प्रयत्न करतो."
यानंतर मित्राला ‘तु काय करतोस?’ हे विचारण्याची गरजच राहिली नाही.
चाळीत ढमढेरे बाई भेटल्या. जगण्यासाठी काय करता असं त्यांनाही विचारलं तर म्हणाल्या "लग्नाच्या आधि विचारलं असतंत तर सांगितलं असतं की ‘गाणं आणि नाच’. पण लग्नानंतर एकदा मिस्टर ढमढेरेंनी माझी कला पाहिली आणि त्यांनी एक सौदाच केला माझ्याशी. फक्त दोन साड्या, स्वैपाकघरात नविन ओटा आणि एका मोठ्या पातेल्याच्या बदल्यात मी माझी कला विकली त्यांना. त्यानंतर मग जगण्यासारखं काहीच राहिलं नाही. आता जगत राहते ते त्या दिवसांसाठी जेंव्हा ढमढेरे कामानिमित्त बाहेरगावी जातात आणि मला घरात नाचगाणं करता येतं."
(ह्याच दिवसात चाळीतली लोकं सुद्धा कुठे कुठे बाहेर जातात. त्यांनीही ढमढेरे बाईंशी सौदा करण्याचा प्रयत्न केला पण ह्यावेळेस बाईंनी आपली कला विकली नाही. असो... )
मित्र-मैत्रिणींनो....
जगण्यासाठी आपण काय करतो हे ढमढेरे बाईंना माहिती आहे.... माझ्यासाठी अजुन असं काय आहे याचा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच....
पण तुमचं काय ?
समजा कोणी विचारलं की तुम्ही जगण्यासाठी काय करता? तर काय उत्तर द्याल तुम्ही ?
हात जाईल पोटावर, कारण भुक्कड नोकरीचं
का नाव येईल ओठावर, एखाद्या फक्कड छोकरीचं ?
कलेसाठी जगता तुम्ही का समाजसेवाचा ध्यास घेता ?
खाण्यासाठी जन्म आपला का गाण्यासाठी श्वास घेता ?
काय जगता? कसं जगता?
कळवा..... अगदी बिनधास्त कळवा.... तुमच्या उत्तराची वाट बघतोय....
- धुंद रवी
[ टीप:- हा लेख मला माझ्या नितीन शेडगे या परिचयाच्या व्यक्तीने मेल केला होता, तो इथे प्रसिद्ध केला. ]
No comments:
Post a Comment